Others

सावधान… ओमिक्रॉनचा दुसरा बळी ..

By PCB Author

December 31, 2021

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – कोरोनाचा उद्रेक होताना दिसतो आहे. दिवसागणिक संसर्ग वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. संसर्ग असाच वाढत राहिला तर देशाला तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं. अशातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं तर हैराणच करुन टाकलंय. देशात आज ओमिक्रॉनचा दुसरा बळी गेल्याने चिंता वाढली आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्राॅननं तर चिंतेत आणखी भर पाडली आहे. रोज कुठेना कुठे ओमिक्राॅनचा रुग्ण आढळत आहे. आता मृत्यूचा आकडाही वाढताना दिसत आहे. आतापर्यंत देशात ओमिक्राॅनमुळे दोन जणांचा बळी गेला आहे. ओमिक्राॅनची बाधा झालेल्या नायजेरिया येथून आलेल्या रुग्णाचा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील रुबी एलकेअर कार्डीयाक सेंटरमध्ये मृत्यू झाला. 28 डिसेंबरला हृदय विकाराच्या झटका आला म्हणून त्याला दाखल केले होते. तर आता दुसरा मृत्यू उदयपूरमध्ये 73 वर्षीय वृद्धाचा झाला आहे. त्यामुळे आता चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान, ओमिक्राॅन या नव्या व्हेरिएंटनं सगळीकडे एकच खळबळ माजवली आहे. कारण दिवसागणिक संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता चिंताजनक वातावरण झालं आहे.