‘सावजाची शिकार मीच करणार, त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही’ – उध्दव ठाकरे

0
489

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – ‘सावजाची शिकार मीच करीन. त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही. शिकारीसाठी आता बंदुकीची गरज नाही. सावज दमलंय,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली. दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी देश आणि राज्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. 

यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले की, माझ्या खांद्यावर कुणाचीही बंदूक नाही. बंदूक माझ्या हातात आहे. त्यामुळे सावज टप्प्यात आल्यानंतरच बार उडवणार,’ असे सांगून ‘काही वेळा सावजावर गोळी मारण्याची गरजच नसते. ते पळून पळून पण पडू शकते,’ अशी खोचक टिप्पणी उद्धव यांनी केली. तसेच ‘ज्या शिवाजी महाराजांनी कृष्णाने सांगितलेली गीता अंमलात आणली. त्या शिवरायांच्या पुतळ्याची उंची कसली मोजताय?, असे टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

आम्ही जे करतो ते केवळ विरोधाला विरोध म्हणून कधीच करीत नाही. त्याचसाठी शिवसेनेने अविश्वासदर्शक ठरावावर तटस्थ राहण्याची भूमिका घेतली, असे ठाकरे यांनी सांगितले. ‘कुणाच्याही मागे आम्ही फरफटत जाणार नाही. कुणाच्याही दुसऱ्याच्या लढाईची बंदूक मी शिवसेनेच्या खांद्यावर ठेवू देणार नाही. जनतेची लढाई शिवसेना, शिवसेना म्हणून लढेल, पण आम्ही कुणाच्याही मागे फरफटत जाणार नाही,’ असे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले.