सावंतवाडीचे शिवसेनेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर

0
533

सिंधुदुर्ग, दि. १४ (पीसीबी) – सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे  शिवसेनेला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात बबन साळगावकर यांचा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.  

बबन साळगावकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.  साळगावकर यांनी तीन वेळा सावंतवाडीचे नगराध्यक्षपद भूषवले आहे. गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक म्हणून  बबन साळगावकर यांना ओळखले जाते. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊन आगामी निवडणुकीत दीपक केसरकरांना शह देण्याची खेळी राष्ट्रवादीकडून खेळली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पाच महिन्यापूर्वी बबन साळगावकर यांनी शरद पवार यांची आंबोली येथे भेट घेतली होती. त्या भेटीनंतरच साळगावकर  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यास शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.