Pune

सारंग पाटील यांची माघार पार्थ पवार यांच्यासाठीच, पण राष्ट्रवादीने वृत्त फेटाळले

By PCB Author

July 28, 2020

पुणे, दि. २८ (पीसीबी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरणार नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार सारंग पाटील यांनी माघार घेतल्याने पार्थ पवार यांच्याही नावाची चर्चा रंगली होती.

लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून अत्यंत दारूण पराभव झाल्यानंतर पार्थ पवार गेल्या काही महिन्यात राजकारणात सक्रीय होताना दिसत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ यांनी कालच केली होती. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना भेटून कोरोना परिस्थितीची माहिती त्यांनी घेतली. मावळ तालुक्यातही त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. मावळ लोकसभा निवडणूक लढविण्यापूर्वी ज्यावेळी नावे चर्चेत होती त्यावेळी खुद्द शरद पवार यांनी पार्थ पवार उमेदवार नाही असे ठासून सांगितले होते. पवार कुटुंबात मोठे राजकारण रंगले आणि अखेर पार्थ पवार हेच उमेदवार झाले. स्वतः शरद पवार यांनाच पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडावा लागला. पहिल्याच भाषणात पार्थ पवार यांची परिक्षा झाली आणि त्यातूनच पराभवाचे बीज रुजले. राष्ट्रवादीतील या दुफळीचा शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना फायदा मिळाला. त्यानंतर पार्थ पवार हे गेले वर्षभर पडद्या आड होते. पदवीधर मतदारसंघातून त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. केवळ त्यांच्यासाठीच संभाव्य उमेदवार सारंग पाटील यांनी सर्व तयारी केली असताना त्यांनी आपण निवडणूक ल लढिविणार नसल्याचे जाहीर केले. या निर्णयाचा पाटील यांच्या समर्थकांनाही धक्का बसला आहे.

पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. पार्थ पवार पदवीधर मतदारसंघातून नशीब आजमवणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या, मात्र हे वृत्त राष्ट्रवादीने फेटाळले आहे. दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार सारंग पाटील यांनी माघार घेतली आहे. सारंग पाटील हे राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र. साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव करुन श्रीनिवास पाटील निवडून आले होते. भर पावसातही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेतील भाषण सुरु ठेवत श्रीनिवास पाटील यांन निवडून आणण्याचे आवाहन मतदारांना केले होते. त्या निमित्ताने ही निवडणूक चांगलीच गाजली होती.