सायबर क्राईमकडे तक्रार – आयुक्तांचा मोबाईल क्रमांक देऊन छळवणूक

0
272

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – महापालिकेतील तीन अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाईसाठी थेट आयुक्तांना मिस कॉल देण्याचे आवाहन फेसबूक माध्यमातून करणाऱ्या भाजप नगरसेवक तुषार कामठे यांच्या विरोधात सायबर क्राईमकडे तक्रार करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय विभागाने जे साहित्य खरेदी केले त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप नगरसेवक कामठे यांनी केला आहे. या प्रकऱणात काही अधिकाऱ्यांना लाच मिळाली आणि ते पैसे संबंधीत ठेकेदाराने त्या अधिकाऱ्यांच्या बँक खात्यात  थेट जमा केले असे कामठे यांनी निदर्शनास आणून दिले. त्याबद्दलचे बँकेतील खाते पुस्तकातील जमा रकमेच्या नोंदी असलेले पुरावे सादर केल्या असल्याने आता संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. ही कारवाई जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचे सांगत कामठे यांनी आज फेसबूक लाईव्ह च्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यात बोलताना नागरिकांनी आयुक्तांना मिस कॉल द्यावा, असे आवाहन करत आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे दोन्ही मोबाईल क्रमांक त्यांनी दिले. त्याचा परिणाम आज दिवसभर आयुक्तांचे मोबाईल सतत वाजत होते.

याबाबत आयुक्त हर्डीकर म्हणाले, नगरसेवक तुषार कामठे यांनी ज्या प्रकरणाची तक्रार केली त्याबाबत चौकशी सुरू आहे. संबंधीत अधिकाऱ्यांना नोटीस काढली होती. त्यांचे खुलासे आले आहेत. त्यांच्या खात्यावर पैसे कसे आले याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. पुढची जी कारवाई असेल ती रितसर होईल. त्यांच्या अर्जाची ताबडतोब दखल घेतली आहे. मात्र, त्यासाठी फेसबूकच्या माध्यमातून ज्या पध्दतीने त्यांनी मोबाईल क्रमांक देऊन एक प्रकारे छळवणूक आरंभली ते चुकिचे होते. कोरोनामुळे दिवसभर व्यस्त असतो, त्यात आज सतत मिस कॉलमुळे भयंकर त्रास झाला. खूप मनस्ताप झाला. याबाबत सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली आहे.