Maharashtra

साप सोडण्याचा कट रचणाऱ्यांचे संभाषण आमच्या हाती – चंद्रकांत पाटील

By PCB Author

July 27, 2018

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – ‘वारीत साप सोडण्याचा कट रचणाऱ्या बड्या नेत्यांचे फोनवरील संभाषण आमच्या हाती लागले आहे,’ असा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी ही माहिती दिली.

‘वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा कट रचणाऱ्यांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या नेत्यांवर सरकारने कारवाई सुरु केली आहे,’ अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चात सामील असणाऱ्या सर्वांनाच सापसोडे म्हटलेले नाही. गुप्तचर विभागाकडून जी माहिती मिळाली त्याआधारे मुख्यमंत्र्यांनी ते विधान केले आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली.

वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, साप सोडण्याच्या धमकीमुळे वारकऱ्यांमध्ये घबराट पसरू नये, यासाठीच मुख्यमंत्र्यांनी आषाढीची शासकीय महापूजा न करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही मुख्यमंत्र्याला आषाढी महापूजा हा मोठा सन्मान असतो, पण त्यावरही त्यांनी पाणी सोडले.