Bhosari

साने चौकीत तक्रारदार महिलेचा विनयभंग करणारा पोलिस तडकाफडकी निलंबित

By PCB Author

October 13, 2018

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – पतीसोबत भांडण झाल्याच्या कारणावरून साने चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या ३६ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या सहाय्यक उपनिरीक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त पद्मनाभन यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

रामनाथ पालवे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचे नावे असून तो साने चौकीत कार्यरत होते. पालवे यांच्याविरोधात चिखली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडीत महिला १० ऑक्टोंबरला तिच्या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी साने चौकीत आली होती. त्यावेळी राजेंद्र पालवे या पोलिसाने, मी आहे, तुम्ही घाबरू नका असा आधार देत, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता या पोलिसाने पीडीत महिलेच्या मुलाच्या फोनवर फोन केला. आणि आईकडे फोन दे असे त्याला सांगितले. मुलाने पीडीत महिलेकडे फोन दिल्यावर पोलिसाने त्यांची विचारपूस करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि थेट आय लव्ह यू म्हणाला.

दरम्यान, संबंधित महिला आणि राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पीडीत महिलेसोबत घडलेला प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. त्यांनतर अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देवून त्याला निलंबित करण्याचे आदेश दिले.