Maharashtra

साध्वी प्रज्ञा सिंहच्या शापापेक्षा उपाशी पोटांचे शाप प्रखर; उद्धव ठाकरेंचा मोदींना इशारा

By PCB Author

April 22, 2019

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – शिवेसना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जेट एअरलाइन्सबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. ‘जेट’चा ताबा घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवाव्यात अशी मागणी करताना, आम्ही कर्मचाऱ्यांची वेदना सरकारसमोर मांडली. त्यांच्या कुटुंबीयांचे शाप घेऊ नका. फक्त साध्वीच्याच शापात दम आहे असे नाही, तर श्रम करणाऱ्यांचे रिकामे हात आणि उपाशी पोटाचे शाप साध्वीपेक्षा प्रखर आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना इशारा दिला आहे.

‘मोदींनी नेहरू, इंदिरांसारखी दूरदृष्टी दाखवावी’

‘सामना’ या मुखपत्राच्या अग्रलेखातून आपली भूमिका मांडताना उद्धव म्हणाले की, पंडित नेहरु आणि इंदिरा गांधी यांनी विमान कंपन्या आणि विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण का केले, हे आता कळले. त्यांना दूरदृष्टी होती. पंतप्रधान मोदींनी ती जेट प्रकरणात दाखवावी असे आवाहन करतानाच, देशी उद्योग मोडायचे आणि परक्या गुंतवणुकीसाठी पायघड्या घालायच्या हे धोरण राष्ट्रीय नसल्याची टीका करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

‘बेरोजगारीचे संकट असताना पंतप्रधान प्रचारात अडकले’

देशात बेरोदगारीचे संकट भीषण होत असताना जेट एअरवेजच्या २२ हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीचे संकट कोसळले आहे. अशात पंतप्रधानांसह संपूर्ण सरकारच प्रचारात अडकले आहे. या गदारोळात २२ हजार जेट कामगार आणि त्यांच्या हलालदिल कुटुंबीयांचा आक्रोश हलवून गेल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘पाकबरोबरचे युद्ध हाच राष्ट्रवाद नाही’

किंगफिशर आणि जेट हे संपूर्णपणे ‘देशी’ उद्योग आहेत. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडियाची ही महत्त्वाची प्रतिमा होती. त्यामुळे हे उद्योग वाचविणे हे राष्ट्रीय कर्तव्य आणि देशभक्तीचेच काम होते. उद्योग वाढवणे व उद्योग वाचवणे हासुद्धा ‘राष्ट्रवाद’ आहे. हे आमच्या राजकारण्यांना कधी समजणार? पाकबरोबरचे युद्ध हाच राष्ट्रवाद नसून बेरोजगारी व भूक या शत्रूंशी युद्ध हासुद्धा प्रखर राष्ट्रवाद आहे अशा शब्दात ठाकरे यांनी केंद्र सरकारला सुनावले आहे.