साताऱ्यातून राजेंची कॉलर ताठ; ९ हजार मतांनी आघाडीवर

0
443

सातारा, दि. २३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले हे प्राथमिक मतमोजणीमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर त्यांनी मतमोजणी सुरु झाल्यानंतर दीड तासांनी ९ हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. उद्यनराजेंविरोधात साताऱ्यामधून भाजपा-सेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे सहदेव एवळे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. पहिल्या दीड तासांमध्ये उदयनराजेंना २७ हजार ८७६ मते मिळाली असून नरेंद्र पाटील यांना १८ हजार २४८ मते मिळाली आहेत. 

सातारा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन वीर, माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण, प्रतापराव भोसले, हिंदुराव निंबाळकर, लक्ष्मणराव पाटील, श्रीनिवास पाटील यांच्यानंतर उदयनराजे भोसलेंकडे या मतदारसंघाची सूत्रे आली. मतदारसंघात मराठा, माळी आणि धनगर या तीन समाजाचे प्राबल्य आहे. दहा वर्षांपूर्वी बुधाजीराव मुळीक यांना सोबत घेऊ न उदयनराजे यांनी खंडाळा ते कोयनानगर मतदारसंघात पायी भूमाता दिंडी काढली होती. या वेळी या मतदारसंघातील प्रश्नांवर त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने उदयनराजे यांच्याकडे गेली दहा वर्षे हा मतदारसंघ आणि विधानसभेतील बहुसंख्य मतदारसंघही याच पक्षाकडे असतानाही हे प्रश्न आजही तसेच आहेत.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचा बालेकिल्ला ठरलेला आहे. जिल्ह्य़ातील बहुतांश सत्तास्थाने याच पक्षाकडे आहेत. पक्षाच्या या शक्तीमुळे उदयनराजे हे मागील दोन्ही निवडणुकांमध्ये मोठय़ा मताधिक्याने निवडून आले. त्यांच्या निवडीमागे ते सांगत असलेले राजेपण जेवढे महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा पक्षाची या जिल्ह्य़ातील ताकद आणि शरद पवार यांनी त्यांच्यामागे लावलेली शक्तीही निर्णायक आहे. मात्र मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. जिल्ह्य़ात भाजपाचे वारूही सुसाट सुटले आहे. तर उदयनराजे यांनी स्वपक्षाबरोबरच अनेकांची नाराजीही ओढवून घेतली आहे. आज सातारा शहर व तालुक्यापासून ते जिल्ह्य़ात सर्वत्र त्यांना विरोध करणारी नवी शक्तिस्थाने उभी राहिली आहेत.