Maharashtra

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपची कोअर टीम सज्ज – निता केळकर  

By PCB Author

September 05, 2018

सातारा, दि. ५ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सूक्ष्म नियोजन केले असून सातारा मतदारसंघात कोअर टीम तयार केली आहे. उमेदवाराची निवड करण्यापासून उमेदवार निवडून आणण्याची या टीमवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. तसेच लाभार्थी संपर्क आणि बुथ सक्षमीकरण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, असे भाजपच्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी निता केळकर यांनी सांगितले. 

पत्रकार परिषदेत बोलताना केळकर म्हणाल्या की, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी तयार केलेल्या कोअर टीमच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या केल्या आहेत. या टीममध्ये विक्रम पावसकर, भारत पाटील, अनिल देसाई, मनोज घोरपडे, दीपक पवार, अविनाश फरांदे, सुवर्णा पाटील, कविता कचरे यांचा समावेश करण्यात आला आहे. टीमच्या संयोजकपदी भारत पाटील तसेच कायदेशीर सल्लागार म्हणून प्रशांत खामकर, अमित कुलकर्णी, सोशल मीडियासाठी दिग्विजय सुर्यवंशी, संदीप भोसले यांची तर प्रिंट मीडियाची जबाबदारी अनिल देसाई, अविनाश फरांदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी आतापर्यंत पक्षातंर्गत अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. इतर पक्षातील नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात  आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंशी याबाबत चर्चा करण्यात आली आहे का? याबाबत  विचारले असता त्यांनी नाही असे सांगितले. त्यादिवशीची आमची सदिच्छा भेट होती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.