साईनाथ बालक मंदिर संघाने पटकावला प्रथम क्रमांक

0
306

पिंपरी,दि.: १७ (पीसीबी) मधुश्री कला आविष्कार आयोजित पाचव्या वार्षिक अभिवाचन स्पर्धेमध्ये चिंचवड येथील साईनाथ बालक मंदिर या संघाच्या ‘मंगल’ या कथा सादरीकरणाने प्रथम क्रमांक पटकावला. लायन्स क्लब ऑफ पुना निगडीचे विभागीय अध्यक्ष हर्ष नायर, देवीदास ढमे, व्याख्याते राजेंद्र घावटे, मधुश्रीच्या अध्यक्ष माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलिम शिकलगार यांची प्रमुख उपस्थिती होती. कीर्ती विद्यालय, सिंधुनगर, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेत किमान दोन ते कमाल पाच व्यक्तींचे एकूण चौदा संघ सहभागी झाले होते. नवतरुण आणि ज्येष्ठ यांच्या सहभागातून अतिशय चुरशीच्या अन् रंगतदार झालेल्या या स्पर्धेतून खालीलप्रमाणे विजेत्या संघांची निवड करण्यात आली.

प्रथम क्रमांक :
साईनाथ बालक मंदिर (‘मंगल’) रुपये १५००/- रोख आणि प्रशस्तिपत्र
द्वितीय क्रमांक :
प्रतिबिंब (‘नवसाची बायको’) रुपये १२००/- रोख आणि प्रशस्तिपत्र
तृतीय क्रमांक :
रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालय (‘नव्याण्णव बादची एक सफर’) रुपये १०००/- रोख आणि प्रशस्तिपत्र
उत्तेजनार्थ : एक
शब्दरंग साहित्य कट्टा (‘पालवी’) रुपये ५००/- रोख आणि प्रशस्तिपत्र
उत्तेजनार्थ : दोन
भावगंध (‘छोट्यांच्या कविता’) रुपये ५००/- रोख आणि प्रशस्तिपत्र

स्पर्धेतील लक्षणीय अभिवाचनासाठी डॉ. सुनीता निकम (प्रथम), पल्लवी दुसाणे (द्वितीय) आणि चित्रा देशपांडे (तृतीय) यांना प्रत्येकी रुपये ३००/- रोख आणि प्रशस्तिपत्र प्रदान करून वैयक्तिक पातळीवर गौरविण्यात आले. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भेटवस्तू देण्यात आली.
ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी आणि प्रभाकर पवार यांनी परीक्षण केले; तसेच आपल्या मनोगतांमधून स्पर्धकांना मार्गदर्शन केले. माधुरी ओक यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र बाबर, राज अहेरराव, रमेश वाकनीस, अनिकेत गुहे, सुनील देशपांडे, मंजिरी भाके, वर्षा बालगोपाल यांनी संयोजनात परिश्रम घेतले. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले. अजित देशपांडे यांनी आभार मानले.