साईट देण्याच्या कारणावरुन पिंपरीत टोळक्यांकडून स्कूल व्हॅनची तोडफोड

0
1260

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – साईट देण्याच्या कारणावरुन पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका स्कूल व्हॅनची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि.२७) रात्री साडेबाराच्या सुमारास नाणेकरचाळ, पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी स्कूल व्हॅनचालक विजय प्रभाकर बानायत (वय ३२, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसाधार, अज्ञात पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्हॅनचालक विजय हे मंगळवारी रात्री त्यांच्या स्कूल व्हॅनमध्ये इंधन भरण्यासाठी निघाले होते. ते पिंपरीतील नाणेकरचाळ येथील रस्त्यावरुन जात असताना त्यांच्या पुढे रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची कार उभी होती. विजय यांनी हॉर्न वाजवून त्यांना कार बाजूला घेण्यास सांगितले. मात्र कारमधील पाच ते सहा मद्यधुंद तरुण विजय यांच्याकडे धावून आले. त्यांच्या वाद सुरु झाला आणि आरोपींपैकी एकाने विजय यांच्या व्हॅनची तोडफोड करण्यास सुरुवात केली. विजय यांनी त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी त्यांना देखील मारण्यासाठी धावून आले. यामुळे घाबरलेले विजय यांनी तेथून पळ काढला आणि थेट पिंपरी पोलीस ठाणे गाठले. आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पिंपरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.