सांगुर्डी-बोडकेवाडी इंद्रायणी नदीवर जोड-पुल रखडला; २ ऑक्टोंबरपासून वसंत भसे यांचे उपोषण

0
646

मावळ, दि. १ (पीसीबी) – मावळातील सांगुर्डी-बोडकेवाडी दरम्यान इंद्रायणी नदीवर जोड-पुलाचे काम गेली आठ वर्षापासून रखडले आहे. या पुलाचे काम तातडीने पुर्ण व्हावे, यासाठी सांगुर्डी गावातील वसंत भसे २ ऑक्टोंबरपासून जो़ड-पुलाच्या शेजारील महादेव मंदीराजवळ आमरण उपोषणाला बसणार आहेत. 

सांगुर्डी-बोडकेवाडी दरम्यान इंद्रायणी नदीवर जोड-पुलाचे काम पीडब्लूडी मार्फत आठ वर्षापुर्वीच सुरू करण्यात आले होते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे ठेकेदारांनी काम थांबवले. त्यामुळे गेल्या आठ वर्षापासून या पुलाचे काम रखडले आहे. या रखडलेल्या कामासंबंधी सांगुर्डी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरवठा केला. परंतू, अद्यापही या प्रलंबीत कामाला गती आली नाही. पुलाचे काम आजही अपूर्णच आहे.

सांगुर्डी हे गाव पुरग्रस्त आहे. या गावाच्या कडेला असलेली शेती आणि गावाला भविष्यात पुराचा धोका आहे, हे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. हा धोका लक्षात घेवून सांगुर्डीतील ग्रामस्थांनी जानेवारी २०१८ रोजी सांगुर्डी हद्दीच्या बाजूने वाढीव दोन कॉलम करून नंतर नदीपात्राची सीमा संपल्यानंतर भराव टाकण्यात यावा, अशी लेखी मागणी लोकप्रतिनिधींना देण्यात आली होती. मात्र याची कोणतीही शासन दरबारी नोंद घेतली गेली नाही. त्यामुळे २ ऑक्टोंबरपासून वसंत भसे गेल्या आठ वर्षापासून रखडलेल्या काम तातडीने पुर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत.