सांगवीमध्ये एमएनजीएल पाईप लाईनमधून गॅस लिकेज झाल्याने आग

0
452

सांगवी, दि. ११ (पीसीबी) – एमएनजीएल पाईप लाईनमधून गॅस लिकेज झाल्याने आग लागली. ही घटना मयूर नगरी सांगवी येथे मंगळवारी (दि. 11) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सांगवी येथील मयूर नगरी येथे एमएनजीएल कंपनीचे काही कर्मचारी गॅस पाईपलाईनवर काम करत होते. पाईपलाईन गेलेल्या मार्गावरील खोदकाम केले जात होते. ब्रेकरने खोदत असताना गॅस पाईपलाईन फुटली आणि त्यातून गॅस बाहेर पडला. दरम्यान या गॅसने पेट घेतला.

गॅसने अचानक पेट घेतल्याने आगीच्या ज्वाला हवेत उंचीपर्यंत जात होत्या. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन मुख्य विभागाचे दोन आणि रहाटणी उपविभागाचा एक असे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. वेळेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा धोका टळला आहे. आग लागलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.