सांगवीत बिअर शॉपीच्या गल्ल्यातील ४१ हजारांची रोकड चोरट्यांनी केली लंपास

0
523

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – बिअर शॉपीच्या शटरला असलेला कडीकोयंडा उचकटून दोन अज्ञात चोरट्यांनी बिअर शॉपीमध्ये प्रवेश करुन गल्ल्यातील तब्बल ४० हजार ७०० रुपयांची रोकड चोरुन नेली. ही घटना मंगळवारी (दि.१८) रात्री उशीरा नवी सांगवी कवडेनगर येथील सबेरा कॉम्पलेक्समधील बिअर शॉपीमध्ये घडली.   

याप्रकरणी शांता राजु शिंदे (वय ४५, रा. सर्वे नं.५४/२, अरण्येश्वर, आण्णाभाऊ साठेनगर, पुणे) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशीरा दोन अज्ञात चोरट्यांनी नवी सांगवी येथील सबेरा कॉम्पलेक्समधील बिअर शॉपीला असलेल्या शटरचा कडीकोयंडा उचकटून आता प्रवेश करत गल्ल्यातील ४० हजार ७०० रुपये चोरुन नेले. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांगवी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक मधुमती शिंदे तपास करत आहेत.