सांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

0
2121

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आठ जणांच्या टोळक्यांनी एका तरुणावर कोयत्याने जबर वार करुन त्याचा खून करण्याचा प्रत्यन केला. ही घटना शनिवारी (दि.८) सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान जुनी सांगवी येथील जयमालानगर लेन नं.६ च्या सार्वजनिक रस्त्यावर घडली.

वसिम शफिकउद्दीन खान (वय ३०, रा.के/ऑफ उमर अलीम आगा, घर नं.२२, जयमालानगर लेन नं.६, जुनी सांगवी. मुळ रा. उत्तर प्रदेश) असे कोयत्याचा वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोशन मुरली साळुंखे (वय १९), स्वप्निल विष्णु वेदपाठक (वय १९), गणेश ढमाले, अभिषेक चापे, सुरज म्हस्के (सर्व रा. जुनी सांगवी) आणि त्यांचे इतर अज्ञात तीन साथीदारांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी वसिम याचे आरोपी रोशन, स्वप्निल, गणेश, अभिषेक, सुरज आणि इतर तिघा बरोबर पूर्वी कबुतरे आकाशात उडवण्यावरुन भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी वसिम याला त्याच्या घराजवळील रस्त्याजवळ गाटले आणि त्याच्या डोक्यात कोयत्याने प्राणघात वार केला. यामध्ये वसिम गंभीर जखमी झाला. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आठही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपी रोशन आणि स्वप्निल या दोघांना अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत. पोलीस उपनिरीक्षक आहेर तपास करत आहेत.