सांगवीत पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरूणाचा खून

0
747

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने तरूणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. सांगवीतील ढोरेनगर परिसरात मंगळवारी (दि. १६) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.   

अशोक लक्ष्मण बिरादार (वय. ३२ रा. सुसगांव, मूळ कर्नाटक) असे खून झालेल्या तरूणाचे नांव आहे. तर लक्ष्मण खुटेकर (वय.३०, रा. ढोरेनगर, सांगवी) असे आरोपीचे नांव आहे. या प्रकरणी गुरूबाळाप्पा बिरादार यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक हा वाहन चालक म्हणून काम करतो. अशोकची आरोपी लक्ष्मण याच्याशी ओळख होती. त्यामुळे त्याची लक्ष्मणच्या घरी ऊठबस होते. लक्ष्मण घरी नसताना अशोक त्याच्या घरी सतत येत होता. त्यामुळे अशोकचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय लक्ष्मणला येत होता. यावरून लक्ष्मण आणि त्याची पत्नी यांच्यामध्ये सतत खटके उडत होते.

मंगळवारी अशोक लक्ष्मणच्या घरी आला असता रागाच्या भरात लक्ष्मणने अशोकवर धारदार शस्त्राने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर लक्ष्मणने घरातून पळ काढला. दरम्यान, सांगवी पोलिसांनी लक्ष्मणला रात्री उशीरा अटक केली. अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.