Chinchwad

सांगवीत तरुणीने मोबाईल नंबर न दिल्याने अॅसिड टाकण्याची धमकी देऊन काठीने मारहाण

By PCB Author

July 18, 2019

सांगवी, दि. १८ (पीसीबी) – मोबाईल नंबर न दिल्याच्या कारणावरुन एका तरुणीला ॲसिड टाकण्याची धमकी देत काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. १५) दुपारी बाराच्या सुमारास जयमालानगर, जुनी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी पीडित २२ वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तेजस कमलाकर गायकवाड (वय २५, रा. जयमाला नगर, जुनी सांगवी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी तेजस याने पीडित २२ वर्षीय तरुणीला फोन नंबर मागितला आणि त्याच्या घरी येण्यास सांगितले. मात्र तरुणीने येण्यास साफ नकार दिला. यावर चिडलेल्या तेजसने त्याच्या जवळ ॲसिडची बाटली असल्याचे सांगत घरी न आल्यास अंगावर ॲसिड टाकण्याची धमकी तरुणीला दिली. ॲसिड टाकण्याच्या भीतीपोटी तरुणी तेजसच्या घरी गेली. घरी गेल्यानंतर त्याने तरुणीसोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. तसेच तिला काठीने मारहाण केली. आरोपी तेजस याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.