सांगली महापालिकेत पहिल्यांदाच कमळ फुलले; भाजपचा ४१ जागांवर विजय    

0
917

 सांगली, दि. ३ (पीसीबी) – सांगली-मिरज-कुपवाड महापालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच भाजपने जोरदार मुंसडी मारत महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीली पराभवाचा मोठा धक्का बसला. मतमोजणीच्या सुरूवातीला पिछाडीवर असलेल्या भाजपने ४१ जागांवर निर्विवाद  विजय मिळवला. तर, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला ३५ जागावर विजय मिळवता आला. स्वाभिमानी आघाडीला १ जागा मिळाली असून १ अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. सांगली महापालिकेसाठी बुधवारी (दि.१) मतदान झाले होते. आज (शुक्रवार) मतमोजणी झाली.   

सांगली महापालिका निवडणुकीच्या ७८ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात उतरले होते. खरी लढत भाजप आणि काँग्रेस –राष्ट्रवादी यांच्यात झाली. सांगलीचा बालेकिल्ला राखण्याचे काँग्रेससमोर मोठे आव्हान होते. तर सत्ता खेचून आणण्याच्या निर्धाराने भाजप रिंगणात उतरली होती. भाजपने जोरदार मुंसडी मारत काँग्रेसच्या हातातून सत्ता हिसकावून घेतली. सांगली महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्याने महापौरपदी भाजपचा उमेदवार विराजमान होणार हे निश्चित मानले जात आहे.

या निवडणुकीत ६१.२४ टक्के मतदान झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या प्रमुख चार पक्षांसह स्थानिक आघाड्या व अपक्षांनी महिनाभर प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांसह सांगली सुधार समिती, स्वाभिमानी आघाडी, लोकशाही महाआघाडी, अपक्ष महाआघाडी, एमआयएम तसेच अपक्ष असे एकूण ४५१ उमेदवार रिंगणात होते.