Maharashtra

सहा विद्यमान मंत्र्यांना का वगळले? मुख्यमंत्री म्हणतात… 

By PCB Author

June 16, 2019

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मंत्रिमंडळाच्या विस्तारातून सहा विद्यमान मंत्र्यांना वगळण्यात आले. मात्र,  कोणाच्याही अकार्यक्षमतेवर ठेवलेला हा ठपका नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती म्हणून केलेला बदल आहे,  असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) येथे स्पष्ट केले .  पावसाळी अधिवेशनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषेदत ते बोलत होते.

राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे आणि अंबरिश अत्राम या ६ विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, या मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांना मंत्रीपदं गमवावी लागली का? या पत्रकारांच्या प्रश्नावर  मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की,  आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही सरकार आमचेच राहणार आहे. त्यामुळेच काही नव्या लोकांना संधी द्यायची होती, काही प्रादेशिक राजकारणाची गणिते असतात याचा विचार करुन आधी काही जणांना संधी दिली, त्यानंतर आता दुसऱ्यांना संधी दिली. त्यामुळे कोणी खूपच वाईट कामगिरी करीत होत किंवा कोणावर आरोप झाले म्हणून त्यांना वगळण्यात आले असे नाही, असे ते म्हणाले.