सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी झालेल्या वादातून तरुणास मारहाण; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

0
447

चाकण, दि. २१ (पीसीबी) – सहा महिन्यांपूर्वी झालेल्या कोयाळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाला होता. त्या वादाच्या कारणावरून 18 जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. याच्या परस्पर विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यात 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खेड तालुक्यातील कोयाळी येथे घडली.

प्रसाद कांताराम गायकवाड (वय 21, रा. कोयाळी तर्फे चाकण, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पूजा सचिन गायकवाड, ज्योती मंगेश गायकवाड, निखिल शिवाजी भुजबळ, शिवाजी ज्ञानोबा भुजबळ, देविदास अशोक भुजबळ, सुधीर अशोक भुजबळ, अशोक ज्ञानोबा भुजबळ, सतीश महादू गायकवाड, अक्षय अशोक गायकवाड, सुखदेव सुरेश गायकवाड, दशरथ कुंडलिक गायकवाड, तुकाराम रामभाऊ गायकवाड, सोमनाथ शिवाजी गायकवाड, शीतल सोमनाथ गायकवाड, रोहिणी संतोष गायकवाड, रसिका गणेश गायकवाड, सिद्धेश्वर राजाराम गायकवाड, स्वप्नील वामन भाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद गायकवाड आणि त्यांचा मामेभाऊ शुभम राम वाघ (वय 24) सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास दुचाकीवरून दुधाचे कॅन घेऊन कोयाळी गावातील डेअरीमध्ये जात होते. त्यावेळी आरोपी रानमळा वस्तीमधील घरगुती गणपती विसर्जनासाठी ट्रॅक्टरवर जात होते. मागील सहा महिन्यांपूर्वी कोयाळी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत फिर्यादी आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता. त्या रागातून आरोपी गोरक्ष गायकवाड, मंगेश गायकवाड यांनी फिर्यादीचे दोन्ही हात धरून गणेश गायकवाड आणि कुणाल गायकवाड यांनी फिर्यादीस, त्यांच्या पुतण्यास शिवीगाळ करून मारहाण केली.

सुरेखा गायकवाड, ज्योती गायकवाड यांनी फिर्यादी यांच्या आईला शिवीगाळ करून हात पिरगाळला. सदाशिव गायकवाड याने ‘आम्ही तुमची सात आठ एकर जमीन विकत घेतो. तुम्ही हे गाव सोडून चालते व्हा’ अशी फिर्यादी यांना धमकी दिली. त्यानंतर सर्व आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमवूनफिर्यादी यांचा रस्ता रोखून, कुटुंबावर दहशत निर्माण करून शिवीगाळ व धमक्या दिल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तात्रय जगन्नाथ गायकवाड, कांताराम जगन्नाथ गायकवाड, शुभम राम वाघ, प्रसाद कांताराम गायकवाड, तनुजा कांताराम गायकवाड, बाळासाहेब भिकाजी गायकवाड, सुलोचना कांताराम गायकवाड, सुरेखा कांताराम गायकवाड, तेजस संदीप गायकवाड, माऊली संदीप गायकवाड, रेखा संदीप गायकवाड, गायत्री दत्तात्रय गायकवाड, दीपाली दत्तात्रय गायकवाड (सर्व रा. कोयाळी तर्फे चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य गणेश विसर्जनासाठी जात होते. त्यावेळी आरोपी बाळासाहेब गायकवाड यांनी ‘तुम्ही आमच्या तीन घरांना वाळीत टाकून तुमचे गणपती विसर्जनासाठी का आणले’ असे म्हटले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना अश्लील शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी आरोपींनी मारहाण केली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.