सहायक पोलिस आयुक्तावर खंडणीचा गुन्हा, सक्तीच्या रजेवर असताना गणवेशात जाऊन खंडणी मागितली

0
339

सातारा, दि. २७ (पीसीबी) – पुणे शहर पोलिस दलात सहायक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले दीपक हुंबरे यांच्यावर ४० हजाराची खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील भुईंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंबरे यांनी गणवेशात भुईंजमध्ये जाऊन गोळीबार प्रकरणातील एका युवकाला गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी उकळली आहे. विशेष म्हणजे हुंबर सक्तीच्या रजेवर आहेत. तरीही त्यांनी गणवेषात जाऊन खंडणी मागितली आहे. दरम्यान, एका अत्यंत वरिष्ठ अधिकारीच खंडणी प्रकरणात सापडल्याने झोलेल्या या कारवाईमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे शहर पोलिस दलात सहायक पोलिस आयुक्त म्हणून श्री. हुंबरे कार्यरत आहेत. सध्या ते सक्तीच्या रजेवर आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी तरूण हा भुईंजमधील रहिवाशी असून तो व्यावसायिक आहे. पंधरा दिवसांपूर्वी याने भुईंज परिसरात गोळीबार केला होता. त्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. पण तो फरार आहे. त्याची चौकशी सुरू आहे.

दीपक हुंबरे हे यापूर्वी भुईंज येथे उपविभागीय पोलिस अधिकारी होते. त्यांची बदली पुणे येथे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून झाली. सध्याचे भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक शाम बुवा यांचे व हुंबरे यांची ओळख आहे. आठ दिवसांपूर्वी १७ मे रोजी फिर्यादीला भुईंज पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. गोळीबार प्रकरणात त्याची चौकशी करण्यात आली. त्याचवेळी शाम बुवा यांच्या केबिनमधून श्री. हुंबरे बाहेर निघाल्याचे फिर्यादीने पाहिले होते.

फिर्यादी पोलिस ठाण्यातून निघून गेल्यानंतर त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यावर ”आपण डिवायएसपी हुंबरे बोलत असून तुम्ही बसस्थानकावर या,” असे सांगितले. फिर्यादी व त्याचा मित्र त्या ठिकाणी गेले. त्यावेळी हुंबरे यांनी माझे बुवा यांच्याशी बोलणे झाले आहे. तुम्हाला यात काहीही त्रास होणार नाही. माझे काय करता बोला, असे सांगितले. अन्यथा या गुन्ह्यात अडकवावे लागेल, अशी भिती दाखवून खंडणी मागितली.

४० हजारांची रक्कम घेतली
यावेळी फिर्यादी व त्याच्या मित्राने तुम्हाला किती द्यायचे असे विचारले असता ५० हजार रूपयांची खंडणी मागितली. त्यावेळी फिर्यादीने इतके पैसे माझ्याकडे नाहीत, असे सांगितले. त्यांना प्रत्येकी २० हजार देण्यास सांगितले. त्यानंतर हुंबरे यांनी ४० हजारांची रक्कम त्यांच्याकडून घेतली. यानंतर संबंधित युवकाने सोमवारी (ता. २५) भुईंज पोलिस ठाण्यात श्री. हुंबरे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

सहायक आयुक्त हुंबरे अनेक प्रकरणात वादग्रस्त राहिले आहेत. मुंबईतील ड्रग माफीया बेबी पाटणकरला मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. हुंबरे हे वाईला उपविभागीय पोलिस अधिकारी होते. त्यावेळी लाचलुचपत विभागाने हुंबरे यांना अटक केली होती.त्यांच्या अशा प्रकारच्या कारस्थानांमुळे त्यांना दोन महिन्यांपासून सक्तीच्या रजेवर पाठविलेले आहे. सक्तीच्या रजेवर असूनही त्यांनी गणवेशात येऊन खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. आगामी महिनाभरात ते सेवानिवृत्त होणार असल्याचे सांगितले जात आहे.