Pune

सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारासह चौघांना अटक

By PCB Author

February 26, 2020

पुणे, दि.२६ (पीसीबी) – शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री चौघांना अटक केली. आमदार अनिल शिवाजीराव भोसले व त्यांच्या पत्नी आणि भाजप नगरसेविका रेश्मा अनिल भोसले यांच्यासह १६ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री बँकेचे संचालक असलेल्या आमदार अनिल शिवाजीराव भोसले, एस. व्ही. जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी पडवळ, बँकेचे अधिकारी शैलेश भोसले, अधिकारी सूर्याजी जाधव असे या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत ७१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून गैरव्यवहाराची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. हा प्रकार २३ मे २०१९ पूर्वी घडलेला आहे. याप्रकरणी चार्टर्ड अकाउंटंट योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भोसले दांपत्यासह १६ जणांवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे संचालक असलेल्या आमदार भोसले, एस. व्ही. जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी पडवळ, बँकेचे अधिकारी शैलेश भोसले अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. बँकेतील घोटाळ्याची व्याप्ती तपासात अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भोसले यांच्यासह अटक करण्यात आलेल्या चौघांना आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.