ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण केल्याने भाजप नगरसेविके विरोधात गुन्हा

0
804

पुणे, दि. १३ (पीसीबी) – ससून रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टराला भाजप नगरसेविकेने   मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१२) मध्यरात्रीच्या सुमारास ससून रुग्णालयातील आपत्कालीन सेवा विभागात घडली.

डॉ.स्नेहल अशोक खंडागळे असे मारहाण झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, भाजप नगरसेविका आरती कोंढरे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास तक्रारदार डॉक्टर स्नेहल खंडागळे या एका गंभीर रुग्णावर उपचार करत होत्या. त्याचवेळी आरोपी नगरसेविका आरती कोंढरे त्याठिकाणी आल्या. दुसऱ्या एका बेडवर असलेल्या रुग्णांविषयी विचारणा करून येथे डॉक्टर कोण आहेत, या रुग्णाकडे कोण पाहत आहे? अशी विचारणा करत आरडाओरडा करू लागल्या. दरम्यान याच वेळी खंडागळे या ठिकाणी आल्या असता आरती कोंढरे यांनी त्या रुग्णावर त्वरित उपचार करण्यास सांगितले. रुग्णावर प्राथमिक उपचार झाले असून पुढील तपासणीकरता पाठवायचे असल्याचे कोंढरे यांना सांगितले. परंतु, कोंढरे यांनी काहीही न ऐकता या रुग्णाला लगेच घेऊन जा, असे सांगत आरडाओरडा केला आणि डॉक्टर स्नेहल खंडागळे यांना मारहाण केली. या सर्व प्रकारानंतर डॉक्टर स्नेहल खंडागळे यांनी बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करत आहेत.