Pune

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांना काळे फासण्याचा इशारा दिल्याने तृप्ती देसाईला पोलिसांनी घेतले ताब्यात

By PCB Author

July 12, 2018

पुणे, दि. १२ (पीसीबी) – ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांना काळे फासण्याचा इशारा दिल्याने सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना आज (गुरुवार) सकाळी पोलिसांनी त्यांच्या कात्रज येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. पुण्यात एका आंदोलनादरम्यान त्यांनी हा इशारा दिला होता. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता म्हणून नेमणूक करून घेतल्याचा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला होता. बनावट प्रमाणपत्र सादर करून डॉ. चंदनवाले यांनी शासन आणि अपंगांची फसवणूक केली आहे. डॉ. चंदनवाले हे मुळचे जळगावचे रहिवाशी असल्याने त्यांच्यावर भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा वरदहस्त आहे, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोपही देसाई यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यानी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी देखील देसाई यांनी केली होती. मात्र हे सर्व आरोप ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांनी फेटाळून लावले आहेत.