Maharashtra

सलमान खानला शेराकडून जीवे मारण्याची धमकी; शेराला अटक

By PCB Author

November 20, 2018

मुंबई, दि. २० (पीसीबी) –  दबंग सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी उत्तर प्रदेशातून आरोपी शेराला अटक केली आहे. योगायोग म्हणजे सलमानच्या खास मर्जीतील अंगरक्षकाचे नावही शेरा आहे. त्यामुळे सुरुवातीला शेराच्या अटकेचे वृत्त पसरल्यानंतर चाहते चांगलेच गोंधळले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी शेरा अनेकवेळा गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सलमानच्या वाटेकडे डोळे लावून बसत होता. मात्र सलमानची भेट घेण्याची संधी त्याला मिळाली नाही. सलमानची भेट न झाल्याने शेराने सलमानच्या कर्मचाऱ्याला फोन केला. सलमानशी बोलू न दिल्यास सलमानचा जीव घेईन, अशी धमकी शेराने दिल्याचा आरोप आहे. सलमानच्या पीएने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून आरोपीला बेड्या ठोकल्या.