सर, तुम्ही उशीर केला, सात वर्षांपूर्वी त्यांनी तुम्हाला उत्तर दिले असते; रितेश देशमुखचा मंत्री गोयलवर पलटवार

0
995

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – माझ्या वडिलांनी मला चित्रपटात काम मिळावे, यासाठी ते कधीच कुठल्या दिग्दर्शक किंवा निर्मात्याशी बोलले नाहीत. आणि त्याचा मला अभिमान आहे. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. मात्र, जी व्यक्ती तुमच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जिवंत नाही, तिच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. सर, तुम्ही थोडा उशीर केलात. सात वर्षांपूर्वी त्यांनी तुम्हाला उत्तर दिले असते,  अशा शब्दांत अभिनेता रितेश देशमुख यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

पियुष गोयल यांनी सोमवारी २६/११च्या मुंबई हल्ल्याचा संदर्भ देताना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर टीका केली होती. गोयल यांच्या टीकेला विलासराव यांचा पुत्र अभिनेता रितेश देशमुख याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले आहे.

२६/११च्या मुंबई हल्ल्यादरम्यान दिवंगत विलासराव देशमुख एका चित्रपटाच्या दिग्दर्शकाला घेऊन ताज हॉटेलमध्ये गेले होते. त्याच्या चित्रपटात मुलाला काम मिळावे, म्हणून ते चिंतित होते, अशी टीका गोयल यांनी  एका कार्यक्रमात केली होती. गोयल यांना रितेश देशमुखने ट्विटरवर एक पत्र पोस्ट करत सडेतोड उत्तर दिले आहे.  तसेच गोयल यांचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.