सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या २० आमदारांत महाराष्ट्रातील चार आमदार; लोढा, सोपल, ठाकूर, चव्हाण यांचा समावेश

0
3100

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – देशभरातील एकूण ३ हजार १४५ आमदारांमध्ये सर्वात जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या पहिल्या २० आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चार आमदारांचा समावेश आहे. उद्योगपती आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा हे दुसऱ्या क्रमांकाचे (वार्षिक उत्पन्न ३४.६६ कोटी) श्रीमंत आमदार आहेत. त्यांनी नोकरीतून हे उत्पन्न मिळवत असल्याचे दाखवले आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे सहाव्या क्रमांकावर (वार्षिक उत्पन्न ९.८५ कोटी) आहेत. त्यांनी  वकील आणि शेतीच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळत असल्याचे दाखवले आहे. पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर (वार्षिक उत्पन्न- ५.६१ कोटी) हे १७ व्या स्थानी आहेत. तसेच काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (वार्षिक उत्पन्न ४.५६ कोटी) हे शेवटच्या म्हणजे विसाव्या क्रमांकावर आहेत. चव्हाण यांनी शेतीच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळत असल्याचे दाखवले आहे.

देशात सर्वाधिक श्रीमंत आमदार एन. नागराजू (वार्षिक उत्पन्न १५७.०४ कोटी) हे कमाईच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे सर्वात कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या टॉप २० आमदारांच्या यादीत महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (वार्षिक उत्पन्न ९.०९ लाख) २० व्या स्थानावर आहेत. २०१३ ते २०१७ च्या दरम्यान झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये देशातील ४ हजार ८६ आमदारांपैकी ३ हजार १४५ आमदारांनी वार्षिक विवरणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. तर ९४१ आमदारांनी अजूनही ते दिलेले नाही. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) या ३१४५ आमदारांच्या वार्षिक विवरणपत्रांचा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे.

त्यानुसार देशातील सर्व आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न २४.५९ लाख रुपये आहे. यात दक्षिण विभागातील ७११ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ५१.९९ लाख आहे, तर पूर्व भागातील ६१४ आमदारांचे सगळ्यात कमी म्हणजे ८.५३ लाख रुपये आहे. छत्तीसगडमधील ६३ आमदारांचे सरासरी उत्पन्न ५.४ लाख रुपये असून झारखंडमधील ७२ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ७.४ लाख आहे. पाचवी ते १२ वीपर्यंत शिक्षण असलेल्या १ हजार ५२ आमदारांचे वार्षिक उत्पन्न ३१.०३ लाख रुपये, पदवीधारक आणि पुढील शिक्षण असलेल्या १ हजार ९९७ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न २०.८७ लाख रुपये, तर आठवी पास १३९ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ८९.८८ लाख आहे. ज्या आमदारांनी अशिक्षित असल्याचे सांगितले आहे त्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ९.३१ लाख रुपये आहे.

कर्नाटकातील आमदार श्रीमंत, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

कर्नाटकमधील २०३ आमदारांचे वार्षिक उत्पन्न सर्वाधिक म्हणजे १११.४ लाख रुपये आहे, तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक असून येथील २५६ आमदारांचे वार्षिक उत्पन्न ४३.४ लाख रुपये आहे. देशातील आमदारांमध्ये महिला आमदारांची संख्या २५८ म्हणजेच फक्त ८ टक्के असून त्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १०.५३ लाख रुपये आहे. सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या टॉप २० मध्ये कर्नाटकचे सहा, तर महाराष्ट्राचे चार आमदार आहेत. आंध्र प्रदेश ३, तेलंगणा २ आणि पंजाब, तामिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार, केरळचा एक आमदार आहे. सगळ्यात कमी उत्पन्न असलेल्या टॉप २० यादीमध्ये महाराष्ट्रातील फक्त दोन आमदारांचीच नावे आहेत. आंध्र प्रदेशच्या बी. यामिनी बाला या पहिल्या क्रमांकावर असून त्यांचे वार्षिक उत्पन्न फक्त १३०१ रुपये आहे. ९ व्या क्रमांकावर सांगलीचे आमदार सुरेश खाडे असून त्यांचे वार्षिक उत्पन्न ३९,६९४ रुपये आहे. शेवटच्या क्रमांकावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांचे नाव आहे.