Pune

सर्वसामान्यांमध्ये इंदुरीकर महाराजांची मोठी क्रेझ आहे, पण त्यांनी बोलताना महिलांचा सन्मान राखावा – आदिती तटकरे

By PCB Author

February 16, 2020

पुणे,दि.१६(पीसीबी) – सध्या सर्वसामान्यांमध्ये इंदुरीकर महाराजांची मोठी क्रेझ आहे. आपण सर्वजण त्यांचे कीर्तन-प्रवचन ऐकत असतो. प्रसिद्ध व्यक्ती असताना बोलताना तारतम्य बाळगायला हवं, असं मत राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलं आहे. आदिती तटकरे यांनी इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा अप्रत्यक्ष समाचार घेतला. आदिती तटकरे पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे बोलत होत्या.

आपले मत सामाजिक किंवा सार्वजनिक व्यासपीठावर मांडत असताना निश्चितपणाने महिलांचा, समाजातील व्यक्तींचा सन्मान राखणं महत्वाचं आहे. व्यासपीठावर आपण एकटे म्हणून मत मांडत नसतो. आपल्याकडे लाखो नागरिकांचे लक्ष असते. त्यामुळे या गोष्टींची दक्षता एक सुजान व्यक्ती म्हणून बाळगायला हवी, असंही अदिती तटकरे यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, व्हॅलेंटाईन डे निमित्त अमरावतीलगतच्या चांदूर येथे असलेल्या महाविद्यालयात मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर “मुलींना अशी शपथ द्यायला लावणं ही दुर्दैवी बाब असल्याचं राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.