Maharashtra

सर्वसमावेशक आणि मनमेळाऊ नेतृत्वाचा अस्त – सुधीर मुनगंटीवार

By PCB Author

August 24, 2019

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनाने  देशपातळीवर सर्वसमावेशक विचार करणारे, मनमेळाऊ, मुत्सदी असे जेष्ठ नेतृत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. ही राष्ट्राची मोठी हानी आहे. एक मोठा आधारवड आज हरपला आहे, अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

पेशाने वकिल असलेले अरूण जेटली हे अतिशय विनम्र, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावामुळे विरोधकही त्यांच्या प्रेमात पडत असत. देशात वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने वारंवार त्यांच्याशी संवाद साधण्याचा, त्यांच्यासमवेत बैठकांमध्ये सहभागी होण्याचा योग आला. त्यावेळी त्यांचे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व जे सर्वांना भारून टाकणारे होते ते पहायला मिळाले. त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टीमुळे जीएसटीचे सर्व निर्णय पक्षीय भेद न राहता ना केवळ एकमताने तर ते एक दिलाने मंजूर झाले, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळेच देशात या करप्रणालीची अंमलबजावणी यशस्वी ठरली असेही त्यांनी नमूद केले.. आधी ज्येष्ठ भगिनी आणि माजी मंत्री, राष्ट्रीय नेत्या सुषमा स्वराज यांचे आपल्यातून जाणे आणि आता अरूण जेटली यांच्या निधनाने राष्ट्र दोन अनमोल व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाला गमावून बसले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.