सर्वच अनधिकृत बांधकामांच्या शास्तीकर माफीसाठी विरोधकांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेला घेराव

0
656

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर सरसकट सर्वांनाच माफ करण्यात करण्यात यावा, या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सोमवारी (दि. ११) महापालिकेला घेराव घातला.

या आंदोलनात विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, स्वराज इंडिया अभियानाचे मानव कांबळे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रताप गुरव, छावा संघटनेचे धनाजी येळकर, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, राष्ट्रवादीच्या नगरसेविका अनुराधा गोफणे, प्रज्ञा खानोलकर, वैशाली घोडेकर, नगरसेवक श्याम लांडे, विक्रांत लांडे, रोमी संधू, राजू सावळे यांच्यासह मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राज्य सरकारने एक हजार चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणाऱ्या शास्तीकर माफीसाठी टप्पे ठरवले आहेत. त्यानुसार सहाशे चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्यात आला आहे. तसेच सहाशे ते एक हजार चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना ५० टक्के शास्तीकर आकारण्याचा निर्णय झाला आहे. परंतु, पिंपरी-चिंचवडमधील विरोधी पक्षांची सरसकट सर्वच अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यासाठीच सोमवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेला घेराव घालण्यात आला.