सर्जिकल स्ट्राइकचे तुणतुणे वाजवत राजकारण करणे म्हणजे जवानांचा अपमानच- उद्धव ठाकरे

0
632

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – ‘सर्जिकल स्ट्राइकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केले जात आहे. हा जवानांचा अपमानच आहे. दोन वर्षांपूर्वीच्या सर्जिकल स्ट्राइकने पाकचे शेपूट सरळ झाले नसेल तर दुसऱ्या ‘स्ट्राइक’ची धमकी कसली देता?’, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

भारताने पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करण्याचा इशारा दिला आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक झाला. हा सर्जिकल स्ट्राइक पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच झाला होता, पण सर्जिकल स्ट्राइकमुळे पाकिस्तानला धडा मिळाला काय? या स्ट्राइकने पाकचे शेपूट सरळ झाले नसेल तर दुसऱ्या ‘स्ट्राइक’ची धमकी कसली देता? सर्जिकल स्ट्राइक हा शत्रूला अचानक धक्का देण्यासाठी केला जातो. पण अशा धक्क्याने डोके ताळ्यावर येईल ते पाकिस्तान कसले! आपल्या लष्करप्रमुखांचा आशावाद दुर्दम्य आहे, पण पाकिस्तानकडून आशा बाळगता येणार नाही. सर्जिकल स्ट्राइकचे राजकारण चालले आहे. ते थांबले तरी पुरे’, असंही उद्धव यांनी भाजपला सुनावले आहे.

‘लोकसभा निवडणुकांचा माहोल निर्माण करण्यासाठी असे पाच-पंचवीस स्ट्राइक उद्या केले जातील किंवा एखादे लुटूपुटूचे युद्धही खेळवले जाईल. पण त्यात शेवटी सैनिकांनाच बलिदान द्यावे लागेल. अयोध्येच्या लढ्यात करसेवकांच्या हौतात्म्याने शरयू लाल झाली, पण मंदिर काही झाले नाही. तसे कश्मीर प्रश्नाचे, पाकिस्तान विषयाचे राजकारण केले जात आहे’, अशी टीकाही त्यांनी केली.