सराईत गुन्हेगार राहुल टाक येरवडा कारागृहात स्थानबद्ध

0
314

देहूरोड, दि. ३ (पीसीबी) – देहूरोड परिसरातील सराईत गुन्हेगार राहुल संजय टाक (वय 20, रा. एमबी कॅम्प, किवळे, देहूरोड) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयत्यासारख्या हत्यारांसह चोरी, दरोडा घालणे, हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी करणे, दुखापत करणे, दरोडा घालून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा पोहचविणे, बेकायदेशिररित्या घातक शस्त्र जवळ बाळगणे यांसारखे सहा गुन्हे आरोपी राहुल विराधात सन 2019 पासून दाखल आहेत.

त्याच्या गुन्ह्यांचा आलेख वाढत होता. त्यामुळे देहूरोड पोलिसांनी सहाय्यक आयुक्त, उपायुक्त आणि अपर आयुक्तांमार्फत आरोपी राहुल याच्यावर एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर केला. त्यावर शिक्कामोर्तब करून आयुक्तांनी आरोपी राहुल याच्यावर एमपीडीए कायद्याखाली त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राहुल याला 1 मे रोजी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, उपायुक्त (परिमंडळ दोन) आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर, सहाय्यक आयुक्त (देहूरोड विभाग) संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीबी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तृगार, देहूरोडचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पीसीबी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार, सचिन चव्हाण, देहूरोडचे पोलीस नाईक अनिल जगताप, पोलीस शिपाई यादव यांच्या पथकाने केली.