Desh

‘सरफराज अहमद कर्णधार नाही तर पानवाला’; पाकच्या पराभवानानंतर केआरके चे संतप्त ट्विट

By PCB Author

June 13, 2019

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी)- पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानावर ४१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिली फलंदाजी करताना पाकिस्तान समोर ३०७ धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाला केवळ २६६ धावांपर्यंतच मजल मारता आली. मात्र या पराभवासाठी पाकिस्तानच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाबरोबरच अनेकांनी कर्णधार सरफराज अहमदच्या विचारशून्य नेतृत्वाला दोष दिला आहे. अभिनेता आणि स्वघोषित समीक्षक कमाल खान याने तर अकराव्या फलंदाजाला स्ट्राइक देणाऱ्या पाकिस्तानच्या कर्णधाराला बावळट म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची चांगलीच दमछाक झाली. त्यांचा संपूर्ण संघ ४५ व्या षटकातच तंबूत परतला. २६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद हाफीज बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा कर्धणार सरफराज अहमद फलंदाजीला आला. चार गडी बाद झाल्याने शोएब मलिकच्या साथीने डावाला आकार देत पाकिस्तानचा डाव सावरण्याचे आव्हान सरफराज समोर होते. मात्र एका बाजूला तळाचे फलंदाज स्फोटक फलंदाजी करत असताना दुसरीकडे विकेट संभाळण्याचा नादात सरफराज संथ गतीने धावा करत होता. अखेर मॅक्सवेलने केलेल्या अप्रतीम क्षेत्ररक्षणामुळे सरफराज धावबाद झाला आणि पाकिस्तानचा डाव संपला.

सरफराजच्या या खेळीवर टिका करताना कमाल खान याने त्याला बावळट म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये कलमा म्हणतो, ‘पाकिस्तान चुकून हा सामना हरलेला नाही तर त्यांच्या खेळामुळेच हा पराभव झाला आहे. त्यांचा कर्णधारच बावळट आहे. तुमच्याकडे विकेट बाकी नसताना तुम्ही षटकाच्या शेवटच्या चेंडूला एक धाव घेऊन पुन्हा फलंदाजीला यायला हवे. हा कर्णधार नाही पानवाला असायला हवा,’ असे ट्विट कमाल याने केले आहे.