सरदार पटेलांच्या पुतळ्याचे लोकार्पण; भारतीयांसाठी आजचा दिवस महत्वाचा – पंतप्रधान मोदी

0
685

गांधीनगर, दि. ३१ (पीसीबी) – भारतीयांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. सरदार साहेबांच्या विशाल प्रतिमेचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाल्याने मी स्वत:ला नशीबवान मानतो. सरदार पटेल यांच्यामध्ये कौटिल्याची कुटनिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा लोकार्पण सोहळा मोदींच्या हस्ते आज (बुधवार) पार पडला. 

यावेळी मोदी म्हणाले की, गुजरातच्या जनेतेने दिलेले सन्मानपत्र माझ्यासाठी महत्वाचे आहे. ज्या मातीत मी लहानाचा मोठा झालो, तेथेच माझ्यावर संस्कार झाले. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाच्या पाठीवर थाप टाकते. हे सन्मानपत्र माझ्यासाठी त्याप्रमाणे असून यामुळे मला अधिक प्रेरणा मिळते.

सरदार वल्लभभाई यांचा पुतळा उभारण्यासाठी आधी मी येथे एक मोठा डोंगर शोधत होतो. तो खोदून सरदार वल्लभभाई पटेल यांचे शिल्प साकारण्याचा माझा विचार होता.  मात्र, ते शक्य नव्हते. कारण इतका मोठा डोंगर सापडणे शक्य नव्हते. मात्र, त्यानंतर आज ही प्रतिमा साकारण्यात आली आहे. ज्या पटेल यांनी देशाच्या विभाजनाचा प्रयत्न उधळून लावला. त्यांच्या या स्मारकामुळे त्यांचे सहज, सामर्थ्य आणि संकल्प आपल्यासमोर राहणार आहे. त्यामुळे अशा लोहपुरुषाला मी शतश: नमन करतो.