सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही, ते आपापसातील मतभेदांमुळेच पडेल – चंद्रकांत पाटील

0
543

मुंबई,दि.१५(पीसीबी) – तीन पक्षाचं महाआघाडी सरकार भिन्न विचारांचं असून अनेक विषयांवर मतभेद होत असल्याचे दिसून येत आहे. सरकारमधील मतभेद वाढत जातील आणि विसंवादातून हे सरकार पडेल. त्यासाठी आम्हाला काहीही करावं लागणार नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महाआघाडी सरकार भाजप नेत्यांशी सूडबुद्धीने, द्वेषभावनेतून वागत असून शिवसेनेबरोबर पुन्हा लगेच सूर जुळणे कठीण आहे. महाआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही, आम्हाला त्यात रस नाही. ते आपापसातील मतभेदांमुळेच पडेल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

राजकारणात कटुता, राग फार काळ टिकत नाही. पुन्हा शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तास्थापनेपेक्षा मध्यावधी निवडणुकांचाच पर्याय योग्य राहील, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.