Maharashtra

सरकार दहशतवादाबद्दल गंभीर नाही, ५६ इंच छाती केवळ भाषणापुरतीच, सुप्रिया सुळेंची टीका

By PCB Author

February 22, 2019

बारामती , दि. २२ (पीसीबी) –  दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यामुळे मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संपूर्ण देशात अस्वस्थता असताना सरकार दहशतवादाबद्दल गंभीर नाही ही बाब दुर्दैवी असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

बारामती रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या कामांची आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढवला. मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आल्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सातत्याने सुरक्षितता आणि रोजगारीबद्दल बोलले जात होते. पण सध्या दहशतवादाशिवाय दुसरे काहीही ऐकायला मिळत नाही. पुलवामाच्या घटनेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटोसेशन करण्यात व्यस्त होते. हे सरकार दहशतवादाबद्दल गंभीर नाही ही बाब दुर्दैवी आहे.. केवळ भाषणापुरतेच ५६ इंच छाती असल्याचे सांगितले गेले. नोटबंदीनंतर दहशतवाद कमी होईल असेही सांगण्यात आले.  मात्र गेल्या दोन वर्षात कधी नव्हती इतकी अस्वस्थता संपूर्ण देशात पहायला मिळत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.