सरकार जनतेसाठी आर्थिक पॅकेज देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
350

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – राज्य सरकार जनतेसाठी लवकरच एक आर्थिक पॅकेज जाहीर करणार असून सद्या मंत्रीमंडळात त्याबाबच चर्चा सुरू आहे. लवकरच त्याची घोषणा केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली. महापालिकेतील कोरोना कक्षाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकऱणातर्फे पिंपळे सैदागर येथील उभारण्यात आलेल्या पुलाचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांच्यासह महापालिकेतील विरोधी पक्ष नेते नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर उपस्थित होते.
कोरोनाच्या संकट काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शहराकडे दुर्लक्ष असल्याची कार्यकर्त्यांची कुजबूज होती. पवार यांनी त्याची तत्काळ दखल घेतली. आज सकाळी त्यांनी थेट महापालिका भवनात भेट दिली आणि कोरोनासाठी बनिविलेल्या कक्षाची पाहणी केली. विशेष म्हणजे यावेळी शहराच्या प्रथम नागरिक उषा ढोरे तसेच भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे उपस्थित नव्हते.

उपसमुख्यमंत्री पवार यांनी कोरोना कक्षातील बारीकसारीक माहिती जाणून घेतली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सादरीकरण केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कोरोना साठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, या संकटात जनतेसाठी आर्थिक पॅकेज सरकार देणार आहे.