Pimpri

सरकारी कामात अडथळा आणणं आले अंगाशी… अखेर ‘त्या’ दोघींवर गुन्हा दाखल; नक्की काय आहे प्रकरण

By PCB Author

January 08, 2021

पिंपरी, दि.8 (पीसीबी) : नियंत्रण कक्षातून आलेल्या कॉलनुसार पिंपरी पोलीस घटनास्थळी गेले असता तिथे एका व्यक्तीचे वाहन चोरी केल्याचे सांगण्यात आले. पोलीस संबंधित वाहन चोराला पकडत असताना दोन महिलांनी पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. याबाबत दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. ६) रात्री नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

सोनम कल्याणसिंग चव्हाण (वय २५), नेहा इंद्रजितसिंग चव्हाण (वय १८, दोघी रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई सुरेश सोलवणे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार,पिंपरी पोलिसांना पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षातून फोन आला. नेहरूनगर येथे मित्तल मेडिकलसमोरून एका व्यक्तीने मदतीसाठी फोन केला होता. त्यानुसार फिर्यादी पोलीस शिपाई सोलवणे आणि त्यांचे सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

तिथे गेल्यानंतर कॉलरने सांगितले की, एका व्यक्तीचे त्यांचे वाहन चोरले आहे. त्यावरून पोलिसांनी चोरी करणा-या संशयित व्यक्तीला पकडण्यासाठी गेले असता आरोपी सोनम आणि नेहा यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालून पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.