Desh

सरकारवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला – न्यायाधीश दीपक गुप्ता

By PCB Author

September 08, 2019

अहमदाबाद, दि. ८ (पीसीबी) – सरकारवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे. सरकावर टीका केल्याने देशद्रोही होत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपक गुप्ता यांनी व्यक्त केले आहे.

जो कोणी सरकारवर टीका करेल त्याला जर देशद्रोही ठरवले तर मात्र देशात कठीण परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे परखड मतही त्यांनी नमूद केले. ते अहमदाबादमध्ये वकिलांना मार्गदर्शन करताना बोलत होते. आपण संस्थांवर होणारी टीका बंद करण्याचा प्रयत्न केला तर बिकट परिस्थिती निर्माण होईल. तो लोकशाहीला मोठा धोका असेल, असेही ते म्हणाले.

भारतीय संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. जर तोच अधिकार नाहीसा झाला तर लोकशाही संस्थांना धोका आहे, अशी भिती गुप्ता यांनी व्यक्त केली. प्रत्येक समाजाचे काही नियम असतात. मात्र त्या समाजातील लोक जुन्या विचारांवरच जर चालत राहिली तर त्या समाजाचा विकास खुंटतो. मत-मतांतरानींच नवे विचारवंत घडतात. त्यामुळे मतभिन्नतेचा आदर करायला हवा, असे गुप्ता म्हणाले.