सरकारला जमत नसेल तर; राममंदिर आम्ही बांधू- उद्धव ठाकरे

0
623

मुंबई, दि. १९ (पीसीबी)- अयोध्येत राममंदिराची उभारणी करणे सरकारला जमत नसेल, तर तसे जाहीर करावे. आम्ही ते उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात केली.

पक्षाच्या या ५२व्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली, पण त्यांची भाषा संयत होती. युती तोडण्याबाबत त्यांनी ठोस उल्लेख केला नसला, तरी हिंदुत्वासाठीच आम्ही सत्तेत आहोत, असे सांगत जनतेच्या प्रश्नांवर सरकारशी संघर्षही कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘अच्छे दिन’चे नारे देत सत्तेवर आलेल्या सरकारने नंतर त्या सर्व घोषणा म्हणजे ‘जुमलेबाजी’ होती, असे निर्लज्जपणे जाहीर केले. मग आता राममंदिर हासुद्धा जुमलाच होता का, असा बोचरा सवालही ठाकरे यांनी केला. राममंदिर रखडल्याचा जाब सरकारला विचारण्यासाठी मी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहे, असेही उद्धव यांनी जाहीर केले. पंतप्रधानपदी आल्यापासून गेल्या साडेचार वर्षांत मोदी एकदाही अयोध्येला का फिरकले नाहीत, असा सवालही त्यांनी केला. बाबरी मशीद पडून इतका काळ लोटला. कोणीही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्रीपदी आला तरी महागाईचा रावण तसाच उभा राहतो पण राम मंदिर काही उभे राहत नाही. ‘मंदिर वही बनाएंगे’ असा नारा दिला जातो, मात्र ‘तारीख नही बताएंगे,’ हाच पवित्रा कायम असतो, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

सरकारवर सतत टीका करणारी शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही, या प्रश्नाचा उल्लेख करून त्यांनी उलट सवाल केला की, ‘‘भाजप सत्तेत येण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रयत्न कारणीभूत आहेत. मग ते भाजपला आता सत्तेतून बाहेर का काढत नाहीत, असा प्रश्न त्यांनाही कुणी का विचारीत नाही?’’