Maharashtra

“सरकारने पोल्ट्री धारकांना किमान ५० रुपये नुकसान भरपाई द्यावी”

By PCB Author

March 15, 2020

मुंबई,दि.१५(पीसीबी) – सरकारने पोल्ट्री धारकांना किमान ५० रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला केली आहे.

सध्या कोरोनाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३१ वर येऊन पोहोचली आहे. याचाच फटका पोल्ट्री व्यावसाईकांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने पोल्ट्री व्यावसाईकांना प्रति पक्षी ५० रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

चिकन खाल्याने कोरोना होतो अशा अफवा पसरल्याने चिकनच्या खपावर विपरीत परिणाम झाला आहे. ७० रुपयाला तयार होणारी कोंबडी १० रुपयाला विकण्याची वेळ पोल्ट्री धारकावर आलेली आहे. ही नैसर्गिक आपत्ती समजून सरकारने किमान प्रति पक्षी ५० रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी विनंती राजू शेट्टींनी सरकारला केली आहे.

दरम्यान, सरकारने सर्व शाळा, कॉलेज, आणि मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना व्हायरसमुळे लोक प्रवास करण्यास टाळाटाळ करीत आहेत.