सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही; मराठा आंदोलकांचा निर्धार

0
438

मुंबई, दि. ५ (पीसीबी) –  मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मुंबईत बोलाविलेल्या नियोजन बैठकीत देण्यात आला.

परळी येथील सकल मराठा आंदोलकांनी ९ ऑगस्टला राज्यव्यापी मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी आज (रविवार) मुंबईत विक्रोळी पार्कसाईट येथे बैठक घेण्यात आली.

यावेळी मराठा समाजाला आरक्षणा देण्यासंदर्भात सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा निर्धार या बैठकीत आंदोलकांनी केला. सकल मराठा मोर्चाच्या राज्य समन्वयकांपर्यंत अशी भूमिका मांडण्यात येणार आहे.

तसेच  ७ ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर पुन्हा एक बैठक बोलवण्यात आली आहे. ९ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन लोकशाही मार्गाने करण्याचे आवाहनही आजच्या बैठकीत करण्यात आले. या बैठकीला मुंबई पूर्व उपनगरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.