सरकारनं अट न ठेवता सरसकट नुकसानीचे पंचनामे करावे : शरद पवार

0
550

मुंबई, दि.१५ (पीसीबी)- शेतकऱ्यांवर जे संकट आलंय त्याची माहिती घेतल्यानंतर तातडीनं येण्याची इच्छा होती. परंतु राज्यात जे काही घडत होतं त्यामुळे येणं जमलं नाही. परंतु राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर आम्ही काही ठिकाणची पिकांची स्थिती पाहिली. अनेक महत्त्वाच्या पिकांवर परिणाम झाल्याचं यामध्ये आमच्या निदर्शनास आलं आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतलेल्या माहितीनुसार सरकारने ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु आम्ही सरसकट पंचनामे करण्याची मागणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली.

ज्यावेळी बांधावर जाऊन पाहिले त्यावेळी त्या ठिकाणी मोठे नुकसान झाल्याचं दिसून आले. हरभरा,धान, कापूस, ज्वारी, सोयाबीनचं, तूर, मोसंबी, संत्री या सर्व पिकांचे नुकसान झाल्याचे दिसले. जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला काही आकडेवारी मिळाली. ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्यांचाच सर्व्हे करण्यात आल्याचं यावेळी निदर्शनास आलं. ४४ हजार २१३ हेक्टर क्षेत्र बाधीत झालं असून ८८ हजार २४३ शेतकरी असल्याचं निदर्शनास आल्याची माहिती पवार यांनी दिली. हेक्टरी ६ हजार ८०० रूपयांप्रमाणे नुकसानग्रस्तांना मदत देण्यात येणार आहे. सरकारी आकडेवारीपेक्षा वास्तविक आकडेवारी अधिक असल्याचं आम्हाला दिसलं, असं त्यांनी यावेळी सांगितले.