Maharashtra

सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका; नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला

By PCB Author

September 11, 2022

नागपूर दि. ११ (पीसीबी) – आपल्या भाषणांमुळे चिमटे काढण्यासाठी आणि कान टोचणे व परखड शब्दांत सुनावणी करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या नितीन गडकरींनी नागपूरमध्ये झालेल्या ऍग्रो व्हिजन फाऊंडेशनच्या कार्यक्रमात शेतरकऱ्यांना मार्गदर्शन करताना पुन्हा अशीच जोरदार फटकेबाजी केली.

यावेळी बोलताना त्यांनी मालासाठी बाजारपेठेचं गणित कसं जुळवून आणायचं, यावर बोलताना केलेल्या टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. ते म्हणाले, हे सरकार-बिरकारच्या फार भरवशावर राहू नका यांच्या. मी सरकारमध्ये आहे म्हणून सांगतो तुम्हाला. फक्त परमेश्वरावर अवलंबून न राहाता स्वत: देखील प्रयत्न करावे लागतात, असा संदेश यावेळी गडकरींनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

यावेळी त्यांनी एक विनोदी उदाहरण दिले. आपल्याकडे दोन गोष्टी आहे. एक तर आपला विश्वास सराकारवर आहे किंवा परमेश्वरावर आहे. मुलगा झाला तर लगेच लोक म्हणतात, अरे वा, परमेश्वरानं दिला. आरे बाबा तुझं लग्न झाल्यानंतर तू पुढचा काही कार्यक्रम केला नसता तर मुलगा कसा झाला असता? परमेश्वर आवश्‍यक आहेच. पण तुझे प्रयत्नही आवश्‍यक आहेत ना, असं गडकरींनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.