सरकारचे ११९ एन्काऊंटर चौकशीच्या फेऱ्यात

0
292

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – सन २०१४ मध्ये सुप्रीम कोर्टाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, उत्तर प्रदेश सरकारला विकास दुबेच्या एन्काउंटरची चौकशी करावी लागणार आहे. दरम्यान, गुन्हे नोंदणी अहवालानुसार योगी सरकार सत्तेत आल्यानंतर म्हणजे सन २०१७ पासून आजवर ११८ एन्काउंटर करण्यात आले आहेत. यांपैकी विकास दुबे हा ११९ वा आरोपी आहे, ज्याचाही एन्काउंटर झाला. इंडियन एक्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात झालेल्या या ११९ एन्काउंटर प्रकरणातील ७४ प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली आहे. यासर्व प्रकरणांमध्ये पोलिसांना क्लीनचीट मिळाली आहे. तर ६१ प्रकरणांमध्ये पोलिसांनी क्लोजर रिपोर्टही सादर केला आहे. या अहवालांना कोर्टानेही मंजूरी दिली आहे.
योगी सरकारच्या कार्यकाळात आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आजवर ६,१४५ मोहिमा राबवल्या. यांपैकी ११९ प्रकरणांमध्ये आरोपींचा मृ्त्यू झाला आहे तर २२५८ आरोपी जखमी झाले आहेत. या मोहिमांमध्ये १३ पोलीसही शहीद झाले आहेत. यांपैकी ८ पोलीस कर्मचाऱ्यांचा गेल्या आठवड्यांत कानपूरमधील कारवाईदरम्यान शहीद झाले. तर ८८५ पोलीस जखमी झाले.
कुख्यात गुंड असलेल्या विकास दुबेला अटक करण्यासाठी ३ जुलै रोजी उत्तर प्रदेश पोलीस कानपूर येथे गेले असता त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून विकास दुबे फरार होता. मात्र, काल (१० जुलै) दुबे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. दुबेच्या काही साथीदारांना पोलिसांनी यापूर्वीच ठार केलं आहे. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं.