Maharashtra

सरकारकडून मराठा आंदोलकांवर सुडबुद्धीने गुन्हे; धनंजय मुंडेचा आरोप

By PCB Author

July 27, 2018

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर सुडबुद्धीने गुन्हे दाखल केल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. आंदोलकांवर दगडफेक, जाळपोळ, खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची राज्य सरकारची कारवाई सूडाची आहे. त्याचा निषेध धनंजय मुंडे यांनी केला आहे. सरकारने ही कारवाई तात्काळ थांबवून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, “राज्यातील मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने राज्यभर लाखोंचे ५८ मूक मोर्चे काढले. मात्र या मोर्चांसंदर्भात राज्य सरकारची भूमिका आकसाची राहिली आहे. मूकमोर्चाची सरकारने गंभीर दखल न घेतल्यामुळे अखेर ठोकमोर्चाची घोषणा केली गेली. त्याकडेही गांभीर्याने पाहिले नाही. शेवटी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलपूजा करण्यापासून मुख्यमंत्र्यांना रोखण्याच्या निर्णय आंदोलकांनी घेतला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया तसेच मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या यासंदर्भात केलेल्या वक्तव्यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले, त्यामुळे मराठा आंदोलन चिघळले हे वास्तव आहे.”

“मराठा आंदोलन चिघळण्यास सरकारचा बेजबाबदारपणा, असंवेदनशील वृत्ती आणि सहकारी मंत्र्यांची चिथावणीखोर वक्तव्ये कारणीभूत असताना, त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी मराठा आंदोलकांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसक कृत्ये, खुनाचा प्रयत्न असे गंभीर आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात येत आहे. या कारवाईमुळे मराठा समाजातील तरुणांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होणार आहे. जे सरकार मराठा तरुणांचे आयुष्य घडविण्यास असमर्थ आहे, त्या सरकारला निरपराध तरुणांवर खोटे आरोप ठेवून गंभीर गुन्ह्यात गोवण्याचे अधिकार कुणी दिले?”, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.