सरकारकडून पूरग्रस्तांना मिळणाऱ्या भरपाईत वाढ

0
425

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निवासी भागातील हजारो घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे सरकारकडून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावर्षी २६ जुलै २०१९ नंतर ज्याठिकाणी अतिवृष्टी होऊन घरामध्ये पाणी शिरले व ज्यांचे नुकसान झाले आहे, केवळ त्यांनाच ही मदत दिली जाणार आहे. ही मदत या घटनांपुरतीच मर्यादित राहणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये २ दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी घर पाण्यात बुडाले असल्यास, घर पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा घरांचे पूर्णत: नुकसान झाले असल्यास कपडे, भांडी, घरगुती वस्तुंसाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाते. अशा प्रकारच्या नुकसानीसाठी शासनाकडून प्रति कुटुंब ५  हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. या अर्थसहाय्याच्या रक्कमेत २०१९ या वर्षासाठी शासनाकडून भरीव वाढ करण्यात आली आहे. याअंतर्गत ग्रामीण भागासाठी १० हजार रुपये प्रति कुटुंब व शहरी भागासाठी १५ हजार रुपये प्रति कुटुंब मदत म्हणून देण्यात येणार आहे.