समृद्धी महामार्गाला बाळासाहेब की वाजपेयींचे नांव; शिवसेना-भाजपमध्ये नवा वाद  

0
780

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे की दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नांव द्यायचे यावरून भाजप आणि शिवसेना या दोन पक्षात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या महामार्गाच्या नामांतरावरून दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत.   

या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करुन शिवसेनेने खेळी केली आहे. मंत्रिमंडळ बैठक संपल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेत  मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात निवेदन दिले. समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभाग ( विशेष प्रकल्प ) करत असून या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याबाबत शिंदे आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.

आम्ही आधी नाव देण्याची मागणी केल्याचे सांगून भाजपच्या भूमिकेबद्दल बोलण्यास शिंदे यांनी  टाळले. तर दुसरीकडे, समृद्धी महामार्गाला वाजपेयी यांचे नाव देण्याच्या हालचाली भाजपने सुरु  केल्या आहेत. त्यामुळे  नामांतरावरून दोन्ही पक्षात नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.