“समीर दाऊद वानखेडे, यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा’, म्हणत मालिकांनी समीर वानखेडेंचा जुना फोटो ट्विट करत केला मोठा खुलासा

0
371

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट केला आहे. वानखेडे यांचा अत्यंत तरुण वयातील हा फोटो आहे. त्यावर पैचान कौन? असा सवाल केला आहे. तसेच काही कागदपत्रेही ट्विट करून यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा असंही म्हटलं आहे. तसेच समीर वानखेडे यांचा त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी यांच्या बरोबरचाही फोटो व्हायरल झाला आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबाबतचे दोन ट्विट केलं आहे. पहिल्या ट्विटमध्ये मलिक यांनी वानखेडे यांचा सिंगल फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो अत्यंत जुना आहे. अगदी तरुण वयातील हा फोटो आहे. त्यावर मलिक यांनी पैचान कौन? असा सवाल केला आहे.

मलिक यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये महापालिकेचा एक कागद पोस्ट केला आहे. तो कागद नेमका कशा संबंधातील आहे हे स्पष्टपणे दिसत नाही. मात्र, हा कागद पोस्ट करताना मलिक यांनी त्यावर समीर दाऊद वानखेडे यांच्या फर्जीवाडा इथूनच सुरू झाला असं म्हटलं आहे. मलिक यांनी पोस्ट केलेलं सर्टिफिकेट हे विवाह नोंदणीचं सर्टिफिकेट असावं आणि त्यांच्या पहिल्या लग्नाचं हे सर्टिफिकेट असावं असं सांगितलं जातं. मात्र, हे सर्टिफिकेट नेमकं कसलं आहे याला कुणीही दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान, मलिक यांच्या पहिल्या लग्नाचा फोटोही व्हायरल झाला आहे. या फोटोत एकूण पाच जण दिसतात. त्यात वानखेडेही आहेत. सोबत डॉ. शबाना कुरेशीही आहेत. त्या त्यांची पहिली पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या फोटोच्या सत्यतेबाबत कोणताही दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, मलिक यांनी लागोपाठ दोन ट्विट केले आहेत. आज दुपारी ते पत्रकार परिषद घेऊन या ट्विटबद्दल अधिक खुलासा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.

समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. 2008 ते 2021 पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.